प्रभात वृत्तसेवा नसरापूर – भोर-मांढरदेवी मार्गावरील आंबाडखिंड घाट परिसरात सोमवारी (दि. १५) रात्री भीषण अपघात घडला. आंबाडखिंड (ता. भोर) घाटाच्या प्रवेशद्वाराजवळील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने मांढरदेवीकडे जाणारी चारचाकी कार सुमारे २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली. सुदैवाने कारमधील प्रवासी गंभीर जखमी होण्यापासून बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, भोर येथून मांढरदेवीकडे निघालेली टाटा कंपनीची कार आंबाडे बसस्थानकाजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याखालच्या खड्ड्यात कोसळली. वाहनात तीन ते चार प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच आंबाडे परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. अपघातग्रस्त वाहनात एअरबॅग कार्यान्वित झाल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र दुर्घटनेत कारचे नुकसान झाले. सध्या भोर-मांढरदेवी मार्गाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून रस्ता पूर्वीपेक्षा चांगला व सुसाट झाला आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक वेगमर्यादा न पाळता बेदरकारपणे वाहन चालवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच निष्काळजीपणामुळे अशा अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठीबेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.