बाप-लेकाची थरारक लढत ! पोराने वडिलांच्या पहिल्या चेंडूवरच लगावला षटकार (Video)

क्रिकेटच्या मैदानात कधी काय घडेल, याचा नेम नाही! सध्या क्रिकेट विश्वात एका अनोख्या बाप-लेकाच्या जोडीची चर्चा रंगली आहे. अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू मोहम्मद नबी आणि त्याचा मुलगा हसन ईसाखिल यांनी श्पागिझा क्रिकेट लीगमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना सर्वांचे लक्ष वेधले. या सामन्यात हसनने आपल्या वडिलांच्या, म्हणजेच नबीच्या, पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकला आणि मैदानावर धमाल उडवली.
श्पागिझा क्रिकेट लीगमध्ये मोहम्मद नबी ‘मिस एनक’ संघाकडून, तर हसन ‘अमो रिजन’ संघाकडून खेळत आहे. या सामन्यात हसनने १४४ च्या स्ट्राइक रेटने ५२ धावांची तुफानी अर्धशतकी खेळी केली, ज्यामध्ये ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्याने आपल्या वडिलांच्या गोलंदाजीवर ठोकलेला षटकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हसनच्या या खेळीने क्रिकेटप्रेमींना एक नवी बाप-लेकाची जोडी पाहायला मिळाली, जी मैदानावर आणि मैदानाबाहेरही चर्चेचा विषय ठरली आहे.
SON HITTING FATHER FOR A SIX.
– Hassan Eisakhil welcomed his father Mohammad Nabi with a six. 😄pic.twitter.com/2T1gzzXkzq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 22, 2025
मोहम्मद नबी काय म्हणाला?
हसनच्या या दमदार खेळीवर मोहम्मद नबीने कौतुकाचा वर्षाव केला. यापूर्वीच नबीने मुलासोबत अफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “हसनसोबत खेळणे माझे स्वप्न आहे. तो खूप मेहनती आहे, आणि मी त्याला सतत कठोर परिश्रम करण्यास सांगतो. फक्त ५०-६० धावा पुरेशा नाहीत, त्याने १०० पेक्षा जास्त धावा करण्याचे ध्येय ठेवावे. तो माझे ऐकतो आणि खूप प्रयत्न करतो. मी त्याला खेळात आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेहमी सल्ला देतो.”





