पुणे जिल्हा | चौधरवाडीत खासदार केसरीचा थरार : कॉकटेल आणि चिक्या मानकरी

सोमेश्वरनगर, (वार्ताहर)- बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथे खासदार सुनेत्रा पवार यांची खासदारपदी निवड झाल्यानिमित्त खासदार केसरी बैलगाडा शर्यतीत पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल आणि गोकुळ अण्णा झेंडे यांचा चिक्या या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवला. विजयी बैलजोडीला सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे आणि ऋषी गायकवाड यांच्या हस्ते खासदार केसरी किताब देण्यात आला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे, ऋषी गायकवाड मित्र परिवाराच्यावतीने या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल, श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त चौधरवाडी येथे स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धेमध्ये एकूण ५३२ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. शर्यतीसाठी पहिले बक्षीस एक लाख रुपये, दुसरे बक्षीस ७५ हजार रुपये तर तिसरे बक्षीस ५१ हजार रुपये देण्यात आले. आणखी पाच बक्षीसे देण्यात आली. स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक तनिष्का सागर घाडगे मुरूम यांच्या बैलजोडीने मिळवला. तृतीय क्रमांक पनवेल येथील नेरे गावाच्या केरबा पाटील यांच्या बैलजोडीने मिळवला. नीरा येथील संग्राम ग्रुप नीरा यांची बैलजोडी ही चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली.
पाचव्या क्रमांक चंद्रकांत मांगडे मांगडेवाडी यांच्या बैलजोडीने मिळवला. सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले स्वप्निल दीपक साखरे यांची बैलजोडी आणि सातव्या क्रमांकाचे बक्षीस वडकी येथील अनुजा नितीन शेवाळे यांच्या बैलजोडीने मिळवले. आठव्या क्रमांकाचे बक्षीस उरुळी कांचन येथील तुळजा भवानी प्रसन्न हॉटेल शौर्यवाडा यांच्या बैलजोडीने मिळवला.
शर्यतीचे नियोजन अखिल भारतीय बैलगाडा संघटना बारामती तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे संचालक सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, प्रवीण कांबळे, रमाकांत गायकवाड, प्रवीण गायकवाड, निलेश गायकवाड, सोरटेवाडीचे सरपंच अजित सोरटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.





