Pimpri : शेलारवाडीत रंगला मॉक ड्रीलचा थरार

पिंपरी : आपत्कालीन परिस्थितीत बचाव व मदतकार्य प्रभावीपणे, तत्परतेने व सतर्कतेने राबवून अपघातात प्रवाशांना कशी मदत करता येईल, यासाठी पुणे रेल्वे विभागातर्फे शुक्रवारी (दि.20) संयुक्तपणे मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. पुणे – लोणावळा रेल्वे मार्गाच्या पुणे रेल्वे विभागाच्या बेगडेवाडी स्थानकावर 01234 पेरांबूर – प्रयागराज कुंभ एक्स्प्रेस या ट्रेनच्या दोन डब्यांच्या अपघाताची माहिती स्टेशन मास्टरला मिळाल्यानंतर, सर्व संबंधित विभागांना रेल्वे नियंत्रणाद्वारे तत्काळ माहिती देण्यात आली.
कार्यालयाने माहिती दिली आणि पुणे स्थानकातून अपघाती मदत गाडी आणि वैद्यकीय मदत गाडी अपघातस्थळाकडे रवाना करण्यात आली.विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू राणी दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंग यांच्यासह वैद्यकीय पथक, रेल्वेचे इतर अधिकारी आणि रेल्वे संरक्षण दल तत्काळ अपघातस्थळी पोहोचले आणि मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर पार पडले.
या अपघाताची माहिती एनडीआरएफ एमसीओ आणि स्थानिक प्रशासन, पोलीस, राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागाला देण्यात आल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न लावता आपापल्या टीमसह अडकलेल्या प्रवाशांच्या मदत आणि बचाव कार्यात सहभाग घेतला. अपघात निवारण कर्मचारी आणि एनडीआरएफने त्यांना विविध साधनांच्या साहाय्याने बाहेर काढले.
रेल्वेच्या वैद्यकीय पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमी प्रवाशांवर आवश्यक प्राथमिक उपचार करून त्यांना राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपाचाराकरिता दखल केले.
मदत आणि बचाव कार्यादरम्यान, एनडीआरएफ कमांडंट एस. बी. सिंग, डेप्युटी कमांडंट प्रवीण धस, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता शादाब जमाल व विजयसिंह दडस, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता नारायण माहेश्वरी, वरिष्ठ विभागीय अभियंता मनीष सिंह , वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी राजेंद्रकुमार कथल, पुणे रेल्वे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एन.के. संजीव, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, सहायक विभागीय सुरक्षा अधिकारी दिलीप तायडे आदी उपस्थित होते.





