कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षांची चिमुरडी जखमी

कराड – कोपर्डे हवेली, ता. कराड येथे आईच्या हाताला धरून घरासमोरून चालत जाणार्या अविरा स्वप्निल सरगडे या तीन वर्षांच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्याने मंगळवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास हल्ला केला. कुत्र्याने तिच्या दंडाचा चावा घेत, तिला सुमारे 50 फूट फरपटत शेतात नेले. चिमुरडीच्या आईने आरडाओरडा करून, कुत्र्याला पळवून लावले. अविरावर कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अविरा सरगडे ही मंगळवारी सायंकाळी 5.30 च्या घरासमोर खेळण्यासाठी आई पूजा यांच्या हाताला धरून चालत असताना, भटक्या कुत्र्याने तिच्यावर पाठीमागून हल्ला केला. कुत्र्याने अविराच्या हाताला व दंडाला चावा घेऊन तिला 50 फूट फरपटत शेतात नेले. पूजा यांनी प्रसंगावधान दाखवून कुत्र्याला पळवून लावल्याने अनर्थ टळला.
कुत्र्याने चावा घेतल्याने अविराच्या दंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. तशा परिस्थितीत पूजा यांनी ग्रामस्थ व नातेवाइकांच्या मदतीने तिला कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेने कोपर्डे हवेली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.





