भीषण अपघात : लग्नाचा बस्ता बांधायला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 जणांचा जागीच मृत्यू

हैदराबाद – तेलंगनातील महबूबाबाद जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. ट्रक-ऑटोच्या भीषण अपघातात रिक्षाचालकासह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी गुडूर मंडल येथील मरिमिट्टा गावाजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशी रिक्षाला ट्रकने समोरून टक्कर दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. रिक्षामधील आठ प्रवाशांपैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. ट्रकने जोरदार धडक दिल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला आहे.

मृतांमध्ये एकाच परिवारातील पाच लोक असल्याची माहिती समोर आली असून हे सर्वजण लग्नासाठी कपडे खरेदी करण्यासाठी वरंगल येथे जात असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये लग्न जमलेल्या मुलीचाही समावेश असल्याची माहिती आहे.

अपघात एवढा भीषण होता की, ट्रकच्या पुढील भागात ऑटो फसला होता. ऑटो आणि त्यातील मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ट्रकचा स्पीड जास्त होता. त्याच्या चुकीमुळेच हा अपघात झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रूग्णालयात दाखल केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.