गोंदवले -मुंबईतील गोरेगाव येथून दोन दिवसांपूर्वी पिंपरी, ता. माण येथे आलेल्या तिघांना करोनाची लागण झाल्याने आणि त्यांच्या संपर्कात चार जण आल्याने पिंपरीकरांना धडकी भरली आहे. मुंबईतील गोरेगाव येथून रविवारी (दि. 31 मे) एक 35 वर्षांचा तरुण पत्नी, सासू व सासऱ्याला घेऊन पिंपरीत आला. त्यांना मनकर्णवाडी फाट्याजवळ पत्र्याच्या शेडमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. या व्यक्तींच्या घशातील स्रावांचे नमुने शिरवळ येथे चेकपोस्टवर घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल काल (दि. 1) रात्री उशिरा आले. त्या तरुणाचा रिपोर्ट निगेटिव्ह तर 27 वर्षांची पत्नी, 65 वर्षांचा सासरा व 60 वर्षांची सासू, यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. हे कुटुंब क्वारंटाइन असताना त्यांना जेवणाचे डबे देणारे तीन जण अतिसंपर्कात आले होते तर डबे देणाऱ्यांच्या संपर्कात त्यांच्या घरातील पाच जण आले. प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे, तहसीलदार बाई माने, पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, सपोनि गणेश वाघमोडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, मंडलाधिकारी भरत कर्णे व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी गावात भेट देऊन रस्ते बंद केले. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली. दरम्यान, बाधितांना जेवणाचे डबे देताना तीन व्यक्तींचा त्यांच्याशी थेट संपर्क आल्याचे स्पष्ट झाले. या बेजबाबदारपणाबाबत प्रांताधिकारी व तहसीलदारांनी स्थानिक यंत्रणेतील सबंधितांची खरडपट्टी काढली.