Maharashtra Assembly Election 2024 । अमित ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढणारे तिसरे सदस्य ठरणार आहेत. त्यांचे वडिल, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. अमित ठाकरे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर माहिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र उभे राहिले आहे.शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना येथून पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना (यूबीटी) चे महेश सावंत देखील मैदानात आहेत. अशा परिस्थितीत, अमित ठाकरे यांना या दोन्ही मातब्बर नेत्यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे.
आदित्य ठाकरे यांना राज ठाकरेंनी दिला होता पाठिंबा
2019 विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि अमित ठाकरे यांचे चुलतभाऊ आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवत जिंकली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, 2020 मध्ये त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली. 2019 मध्ये जेव्हा आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा राज ठाकरे यांनी मन मोठं करत त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता तसेच बिनशर्त पाठिंबा देखील दिला होता. अशातच आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
माहिममधील लढतीत कोण बाजी मारणार?
अमित ठाकरे यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, “माझं भविष्य मतदार ठरवतील. माझ्या वडिलांनी मला संधी दिली आहे, आणि लोकच निकाल ठरवतील.”
दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना मोठ्या मनाचा नेता संबोधत सांगितले की, “आजच्या राजकारणात राज ठाकरे यांच्यासारखे लोक दुर्मिळ झाले आहेत.”
दुसरीकडे, शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, दादर-माहिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, आणि इथे लढायचं नाही, असं होऊच शकत नाही.
2009 ते 2019: माहिममधील राजकीय गणित
माहिममध्ये 2009 साली मराठी मतविभाजनामुळे मनसेला एकमेव विजय मिळाला होता. तेव्हा विद्यमान आमदार सदा सरवणकर काँग्रेसमध्ये गेले होते आणि मनसेचे नितीन सरदेसाई विजयी झाले होते.मात्र, 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी पुन्हा विजय मिळवला.
आता 2024 च्या निवडणुकीत तिन्ही सेना एकमेकांसमोर उभ्या आहेत, आणि या तिन्ही पक्षांमध्ये तीव्र लढत पाहायला मिळेल, हे निश्चित आहे.
मागील निवडणुकांचे निकाल:
2009:
• नितीन सरदेसाई (मनसे) – 48,734 मते • सदा सरवणकर (काँग्रेस) – 39,808 मते • आदेश बांदेकर (शिवसेना) – 36,364 मते
2014:
• सदा सरवणकर (शिवसेना) – 46,291 मते • नितीन सरदेसाई (मनसे) – 40,350 मते • विलास अंबेकर (भाजप) – 33,446 मते
2019:
• सदा सरवणकर (शिवसेना) – 61,337 मते • संदीप देशपांडे (मनसे) – 42,690 मते • प्रवीण नाईक (काँग्रेस) – 15,246 मते