आळंदीमध्ये तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार; तथाकथित ‘महाराज’ गजाआड

आळंदी – पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदीतून खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका वारकरी शिक्षण संस्थेतील संस्थाचालकाने तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी संस्थाचालक महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आळंदी पोलीस स्टेशनमध्ये दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर (वय 52) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 19/2024 कलम भादंवि 377 व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 4, 5 (F), 6, 8, 10 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वारकरी संस्था मृदंग वादनाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित संस्था चालवणाऱ्या तथाकथित महाराजाला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी देखील आळंदीत अशाप्रकारे दुसऱ्या एका संस्थाचालक महाराजाकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. सातत्याने घडत असलेल्या या घटनांमुळे आळंदी परिसरात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करून दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी वारकरी शिक्षण संस्था चालकांना सूचना तसेच काही नियमावली करण्याचीही मागणी केली जात आहे. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.





