Nagar | अजितदादाचे तीन शिलेदार झाले जाहीर

नगर, (प्रतिनिधी) – भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाने तिसर्या दिवशी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात पुन्हा विद्यमान आमदारांना संधी देणत आली असून अहिल्यानगर जिल्ह्यात नगर शहरासाठी आमदार संग्राम जगताप, कोपरगावमधून आमदार आशुतोष काळे तर अकोलेमधून आमदार डॉ. किरण लहामटे या तीन शिलेदारांच्या नावाचा समावेश आहे.
अर्थात अजितदादा गटाकडून या तिघांना उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने या तिघांनीही कामाला सुरूवात केली होती. महायुतीमध्ये भाजपने पाच तर अजितदादा गटाने तीन असे आठ जागांचे उमेदवार जाहीर केले आहेत. अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून एकही जागा जाहीर झालेली नाही.
महायुतीने आठ जागांचे उमेदवारी जाहीर केले असले तरी अजून चार जागांवर खल सुरू आहे. त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.
त्यामुळे या चार जागा नेमक्या कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत उत्सुकता आहे. नेवासा, पारनेर, श्रीरामपूर, संगमनेर या चार जाग नेमक्या कोणाकडे येणार त्यानंतर उमेदवार निश्चित होणार आहे.
भाजपने रविवारी 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच जागांचे उमेदवारांचा समावेश होता. त्यानंतर तिसर्या दिवशी बुधवारी अजितदादा गटाने तीन जागांच्या उमेदवारांची घोषणा केली.
राष्ट्रवादी अजितदादा गटाने विद्यमान तिन्ही आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला पारनेर विधानसभा मतदारसंघ देखील आल्याचे सांगण्यात आले आहे. नुकताच काही नेत्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता या आलेल्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
उर्वरित संगमनेर, नेवासा व श्रीरामपूर या तीन जागाबाबत सध्या तरी संभ्रम आहे. भाजपने या तीनही जागांवर दावा केला आहे. तर शिंदे गटाने नेवासा व श्रीरामपूर या दोन जागांचा आग्रह धरला आहे. यातून काही मार्ग अद्यापही निघालेला नाही.
राष्ट्रवादी अजितदादा गटाला जिल्ह्यात बारापैकी चार जागा वाट्याला आल्या आहेत. त्यापैकी तीन उमेदवार जाहीर झाले असून पारनेरचा उमेदवार देखील गुरुवारी जाहीर होणार आहे. परंतू महायुतीमध्ये भाजप व शिंदे गटाचे तीन जागांबाबत एकमत होत नाही.
सध्या तरी भाजपने या तीनपैकी दोन जागांचा आग्रह धरला आहे. त्यामुळ शिंदे गटाला जिल्ह्यात एकच जागा मिळण्याची शक्यता आहे.
तीही श्रीरामपूर किंवा नेवासा यापैकी एक असेल असे सांगण्यात आले आहे. संगमनेरची जागा शिंदे गटाकडून भाजपच्या वाट्याल येणार असल्याचे सांगण्यात आहे. जिल्ह्यात बारापैकी सात जागांवर भाजपचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे.





