तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा; प्रत्येकी २ लाख रुपये दंड

पुणे : रस्त्याने चाललेल्या तरूणाला अडवून त्याच्यावर हल्ला करत खून केल्याप्रकरणात तिघांना विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालायने जन्मठेपेच्या शिक्षेसह प्रत्येकी दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अक्षय राजाभाऊ मुळे (वय 19, रा खालुंब्रे, ता. खेड), अनिकेत अंकुश दुडे (वय 18, रा. सुदवडी, देहु फाटा, ता. मावळ) व अतुल दीपक शिंदे (वय 20, रा कांदेवस्ती, इंदोरी, ता. मावळ) अशी शिक्षा झालेल्यांची नाव आहे.
दंडाच्या रकमेपैकी पाच लाख रुपये मृताच्या कुटुंबियांना देण्यात यावेत. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.
25 मे 2017 रोजी माळवाडी-तळेगाव रस्त्यावर ही घटना घडली. घटनेत निखिल रामदास पानसरे यांचा खून झाला होता. याप्रकरणी, त्यांचे भाऊ किशोर पानसरे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेच्या दिवशी निखील हे माळवाडी-तळेगाव रस्त्यावरून जात होते. यावेळी, आरोपींनी त्याठिकाणी येत निखिल यांची अडवून त्यांच्यावर हल्ला केला.
याची माहिती मिळताच किशोर घटनास्थळी पोहोचले. यावेळी, निखील त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तर आरोपी दुचाकीवरून पळून जाताना दिसले. निखील यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी, किशोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपींना अटक करत त्यांविरोधात दोषारोपत्र दाखल करण्यात आले. आरोपींनी कट रचून हा खुन केल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले होते.
याप्रकरणात, सरकार पक्षातर्फे सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी काम पाहिले. त्यांनी 16 साक्षीदार तपासले. आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने व कट रचून हा गुन्हा केला आहे. त्यामुळे ते कोणत्याही दयेस पात्र नाहीत असा युक्तिवाद अॅड. साळवी यांनी केला.
सरकारपक्षासह न्यायालयाने बचावपक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत तिघांना जन्मठेप तर दोघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सुटका झालेल्या दोघांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची माहिती अॅड. साळवी यांनी दिली.





