वडूज – खटाव तालुक्यातील आठ जणांच्या करोना चाचण्यांचे अहवाल सोमवारी (दि. 20) रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये वडूज येथील गर्भवती महिला व अन्य दोन जण, डिस्कळ, नेर येथील नागीरकांचा समावेश आहे. वडूज येथील बाधितांच्या संपर्कात आलेले विलगीकरणास तयार होत नसल्याने प्रशासन व नागरिकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
वडूज येथील लोहार गल्लीतील एक वयोवृद्ध बाधित रुग्ण पंधरा दिवसांपूर्वी सापडला होता. त्याचा सातारा येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कातील घरातील काही लोक पॉझिटिव्ह आले होते. आता ही साखळी वाढत चालली असून या कुटुंबाच्या शेजारील राहणाऱ्या तीन महिलांना करोनाची लागण झाली आहे.
त्यात गर्भवती महिलेचा समावेश आहे. या महिला 32, 26 व 23 वर्षांच्या आहेत. डिस्कळ येथे 58 वर्षीय महिला, 47 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय महिला, नेर येथे 63 व 45 वर्षीय पुरुष बाधित आढळले आहेत.
वडूजमधील बाधितांच्या संपर्कात लोहार गल्ली व मुलाणी वाड्यातील 20 ते 25 नागरिक आले आहेत. त्यापैकी काही जण हाय रिस्कमध्ये आहेत. त्यांची तातडीने तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या नागरिकांना मायणीतील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमधे नेण्यास सुरुवात झाली आहे.
तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, पोलीस निरीक्षक अशोक पाटील, उपनिरीक्षक शीतल पालेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. संतोष मोरे, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीनुरूप हालचाली सुरू केल्या आहेत.