रांची : झारखंडची राजधानी रांची येथे धरणात कार कोसळल्याने जमशेदपूरच्या मुख्य जिल्हा न्यायाधीशांच्या दोन अंगरक्षकांसह तीन जणांचा बुडून मृत्यू झाला असून अजून एक जण बेपत्ता आहे. रांचीच्या नागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हटिया धरणात शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. हटियाचे डीएसपी प्रमोद मिश्रा म्हणाले की, पोलिसांना कारमध्ये चार जण असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आतापर्यंत चालक आणि दोन पोलिसांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, तर एक अजूनही बेपत्ता आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ती पाण्यात पडली. अपघात झाला तेव्हा गाडी जमशेदपूरहून येत होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि धरणातून मृतदेह बाहेर काढले. अपघातस्थळावरून पोलिसांनी दोन शस्त्रे आणि एक कार देखील जप्त केली. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे आणि बुडणाऱ्या चौथ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिस काम करत आहेत. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गोताखोरांची घेण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. उपेंद्र कुमार सिंग, रॉबिन आणि चालक सत्येंद्र यांचे मृतदेह सापडले आहेत.