कराड -कराड तालुक्यात गुरुवारी आणखी तिघांचे करोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नव्याने शिंदेवाडी येथे करोनाबाधित रुग्ण सापडला असून खराडे व शेणोली स्टेशन येथेही प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शेरे स्टेशन परिसरातील करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. गावात 11 वा रुग्ण असल्याचे गुरुवारी सकाळी स्पष्ट झाले.
चौदा वर्षांच्या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने परिसरावर करोनाची दहशत कायम आहे. मुंबईतून गावी शेरे स्टेशन येथे 18 मे रोजी एकाच कुटुंबातील 17 सदस्य आले होते. या कुटुंबाला तातडीने क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातील पाच जणांना 21 मे रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने कराड येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यातील तिघांचे रिपोर्ट 23 मे रोजी पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्या कुटुंबातील 12 व त्यांच्या संपर्कातील चार जणांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले होते. या सोळा जणांपैकी एकाच कुटुंबातील सात जणांचे रिपोर्ट दि. 27 मे रोजी पॉझिटिव्ह तर नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यानंतर नऊ जणांना 24 मेपासून अभियांत्रिकी महाविद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले होते.
त्यांच्या घशातील स्रावांचे नमुने मंगळवारी (दि. 2 जून) तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट काल रात्री (दि. 3) उशिरा आले. त्यात 14 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. खराडे येथील 15 वर्षांच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तेथील रुग्णांची संख्या आठ झाली आहे. विंगनजीक शिंदेवाडी येथेही 15 वर्षांच्या युवकाला करोनाची बाधा झाली आहे.