बांधकाम व्यावसायिकांना मिळाला दिलासा
पुणे – करोना रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर केले आहे. यामुळे सर्वच कामे पूर्णपणे बंद आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर महा-रेराने बांधकाम प्रकल्पाना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे मध्ये गृहप्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन ज्या बांधकाम व्यावसायिकांनी दिले होते. त्यांना पुढील तीन महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे.
बांधकाम व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी महा-रेराची (महाराष्ट्र रियल इस्टेट ऍथॉरिटी) स्थापन करण्यात आली आहे. बांधकाम सुरू करण्यापासून ते पूर्ण करण्यापर्यंतची सर्व माहिती महा-रेराला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीत बांधकाम प्रकल्प पूर्ण झाला नाही, तर महा-रेराकडून दंडाची तरतूद देखील करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला शिस्त आली आहे.
परंतु करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 24 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू केला आहे. त्यामुळे बांधकाम प्रकल्पावरील मजूर मोठ्या प्रमाणावर त्यांच्या गावी निघून गेले आहेत. खरेदी-विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी देखील बंद आहे. या पार्श्वभूमीवर महा-रेराला दिलेल्या मुदतीत गृहप्रकल्प पूर्ण करणे शक्य नाही.
हे ओळखून महा-रेराने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात ज्या बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. अशा प्रकल्पांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश महा-रेराकडून काढण्यात आले आहेत.