जांबुत : शिरुर तालुक्याच्या बेट भागात चांडोह गावच्या परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात सर्वाधिक ९ वर्षे वयोमान असणाऱ्या नर संवर्गातील बिबट्याला बुधवारी (दि.१०) रोजी पहाटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मागील दोन महिन्यात बिबट घटनांमध्ये हॉट स्पॉट ठरलेल्या पिंपरखेड व चांडोह परिसरात मागील चोवीस तासांत तीन बिबटे जेरबंद करून त्यांना माणिकडोह (ता.जुन्नर ) येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांत आत्तापर्यंत एकूण २४ बिबटे वनविभागाकडून जेरबंद करण्यात आले आहेत. चांडोह (ता.शिरुर ) परिसरात शेतकरी दत्ता गोविंद वडणे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. मागील अनेक दिवसांपासून या ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत होता तसेच सदर बिबट्याने अनेकदा पशुधनावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला असता भयभीत ग्रामस्थांच्या मागणीनुसार विविध ठिकाणी पिंजरे लावून वनविभागाकडून जेरबंद करण्यासाठी अनेक दिवस या बिबट्याची टेहाळणी करण्यात येत होती अशातच लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आत्तापर्यंत या भागातील नऊ वर्षे एवढे सर्वाधिक वयोमान असणारा बिबट जेरबंद झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर पिंपरखेड (ता.शिरुर) येथील गावठाण व स्मशानभूमी परिसरात वीटभट्टी व्यावसायिक संतोष सोनवणे यांनी देखील अनेकदा बिबट्याचा मुक्त संचार पहिला होता. यावेळी परिसरातील नागरिक भयभीत झाल्याने वनविभागाला याबाबत कापणं देऊन लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि.९) रोजी रात्री आकरा वाजेच्या सुमारास सात वर्षीय नर संवर्गातील बिबट्याला जेरबंद करण्यात आले. जांबूत , पिंपरखेड , फाकटे आणि चांडोह परिसरात ३२ पिंजरे कार्यान्वित असून ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसेल त्या त्या ठिकाणी पिंजरे लावून हे बिबट जेरबंद करण्यात येतील अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. या कारवाया सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे , वनरक्षक लहू केसकर , महेंद्र दाते व बेस कॅम्प जवान हे करत आहेत.