Pune District : पिंपरखेड येथे बारा तासांत तीन बिबटे जेरबंद; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण, पिंजरे वाढविण्याची मागणी

जांबूत : शिरूरच्या बेट भागातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मागील दहा दिवसांपूर्वी शिवन्या बोंबे या चिमुरडीचा तर जांबूत (ता.शिरुर) येथील ७५ वर्षीय भागुबाई जाधव या वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी (दि. २४) रोजी बारा तासांत तीन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून मागील दहा दिवसात एकूण सहा बिबटे जेरबंद करून त्यांची माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात रवानगी करण्यात आली आहे.
शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शेतकरी कचर महादेव बोंबे यांचे उसाचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात सहा ते सात वर्षे वयोमान असलेली पूर्ण वाढ झालेला नर संवर्गातील बिबट्या जेरबंद करण्यात आला. याच वेळी पारगाव रोड परिसरात नरेश सोनवणे यांचे घराजवळील पिंजऱ्यात चार वर्षे तर दाभाडेमळा परिसरात गजानन गिरीगोसावी यांचे शेताचे बाजूला लावलेल्या पिंजऱ्यात पाच वर्षीय वयोमान असणारे मादी संवर्गातील दोन बिबट जेरबंद करण्यात आले आहे.
पिंपरखेड आणि परिसरातील भागात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढलेली असून हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाकडून पिंजऱ्याची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.





