#CWC19 : ‘तीनशे’पारचे संघ आणि निकाल…

पुणे – सध्या इंग्लंड अणि वेल्समध्ये सुरू असलेल्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या फेरीत एकाही संघाला 400 धावांचा टप्पा गाठता आला नाही. तरीही प्रति चेंडू एक धाव या गतीने 50 षटकांत 300 किंवा त्याहून अधिक धावा केलेल्या सामन्यांवर हा एक दृष्टिक्षेप.

स्पर्धेतील रोमांचक सामन्यांची सुरुवात दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश सामन्याने झाली यात बांगलादेशने 6 बाद 330 धावा केल्या. त्यात मुुशफिकुर रहीमच्या 78 तर शाकिब अल हसनच्या 75 धावांचा समावेश होता. तर दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत 8 बाद 309 अशी मजल मारता आली. त्यात फफ डु प्लेसिसच्या 62 तर जीन-पॉल डुमिनीच्या 45 धावांचा समावेश होता.

तर अन्य सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध खेळताना पाकिस्तानने 8 बाद 348 धावा ठोकल्या. त्यामध्ये मोहम्मद हफीझच्या 84 आणि बाबर आझमच्या 63 धावा मोलाच्या ठरल्या. उत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा डाव 9 बाद 334 वर रोखला गेला. यात जो रूट 102 आणि जोस बटलर 103 यांच्या शतकांचा समावेश होता. दोन फलंदाजांची शतके व्यर्थ जाण्याची ही विश्‍वचषकातील पहिलीच वेळ ठरावी.

तर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारताने शिखर धवनचे शतक (117) आणि विराट कोहलीचे अर्धशतक (82) याच्या जोरावर 5 बाद 352 धावा ठोकल्या. तर ऑस्ट्रेलियाला भारताने 316 धावांत रोखले. त्यात डेव्हिड वॉर्नर 56 आणि स्टीव्हन स्मिथ 69 यांनी अर्धशतके झळकावली.

पाकिस्तानविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाचा डाव 49 षटकांत 307 धावांवर संपला. मात्र, ऍरॉन फिंचच्या 82 धावा आणि डेव्हिड वॉर्नरचे शतक (107) यामुळे धावसंख्येला आकार आला. तर पाकिस्तानचा डाव 45.5 षटकांत 266 धावांत संपला. त्यात इमाम-उल-हकची 53 धावांची खेळी केली.

श्रीलंकेविरोधात खेळताना ऑस्ट्रेलियाने 7 बाद 334 धावांचा डोंगर रचला. त्यात ऍरॉन फिंचची 153 धावांची शतकी खेळी तर स्टीव्हन स्मिथच्या 73 धावा मोलाच्या ठरल्या. मात्र श्रीलंका 45.5 षटकांत केवळ 247 धावा करू शकली. त्यांच्या दिमुथ करुणारत्नेचे शतक तीन धावांनी हुकले (97) तर कुसल परेराने 52 धावा ठोकल्या.

स्पर्धेचे आकर्षण असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील लढतीतही भारताने 5 बाद 336 धावांचे आव्हान ठेवले. त्यात रोहित शर्माचे शतक (140) आणि कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक (77) लक्षणीय ठरले. प्रत्त्युतरामध्ये पाकिस्तानला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव 40 षटकांत 212 धावांवर संपला. त्यांच्या फखार झमानला 62 धावांची उल्लेखनीय खेळी करता आली.

बांगला देशविरोधात खेळताना ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा 5 बाद 381 धावांचा पल्ला गाठला. यामध्ये डेव्हिड वॉर्नरचे शतक (166) आणि उस्मान ख्वाजाच्या 89 धावांचे योगदान राहिले. तुलनेने कमजोर समजल्या जात असलेल्या बांगला देशने तुल्यबळ लढत देत 8 बाद 333 धावांपर्यंत मजल मारली. या डावात मुश्‍फिकुर रहीमचे नाबाद शतक (102) आणि महमुदुल्लाचे 69 धावांचे योगदान राहिले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना पाकिस्तानने हरिस सोहेलच्या 89 आणि बाबर आझामच्या 69 धावांच्या जोरावर 7 बाद 308 धावांचा पल्ला गाठला. तर आफ्रिकेला 9 बाद 259 इतकीच मजल मारता आली. त्यात फफ डु प्लेसिसच्या 63 धावा लक्षवेधी ठरल्या.

संपूर्ण साखळी सामन्यातील दुसरी लक्षवेधी लढत ठरली ती भारत आणि इंग्लंडमधील. जॉनी बेयरस्टोचे (111) शतक आणि बेन स्टोक्‍सच्या 79 धावांच्या जोरावर इंग्लंडने 7 बाद 337 असे आव्हान भारतासमोर ठेवले. यात मोहम्मद शमीने 69 धावांत 5 गडी बाद केले. तर रोहित शर्माचे शतक (102) आणि विराट कोहलीच्या 66 धावा असूनही भारताचा डाव 5 बाद 306 वर रोखला गेला.

वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंकेने 6 बाद 338 अशी विशाल धावसंख्या उभारली. त्यात अविष्का फर्नांडोचे (104) शतक आणि कुसल परेराच्या 64 धावा लक्षणीय ठरल्या. तर वेस्ट इंडिजने चांगली लढत देताना निकोलस पूरन 118 आणि फॅबियन ऍलन 51 यांच्या फलंदाजीच्या बळावर 9 बाद 315 धावांपर्यंत मजल मारली. तर, भारत आणि बांगलादेशमधील सामनाही उत्कंठावर्धक झाला. भारताने रोहित शर्माचे शतक (104) आणि लोकेश राहुलच्या 77 धावांच्या जोरावर 9 बाद 314 धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना बांगलादेशचा संघ 48 षटकांत 286 धावा करू शकला.

Leave A Reply

Your email address will not be published.