927 रुग्णांची उच्चांकी वाढ : एकूण करोनाबाधित 13107
पिंपरी – शहरात “करोना’चे थैमान दिवसें-दिवस भीषण होत चालले आहे. बुधवारी “करोना’मुळे 17 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे करोनाच्या एकूण बळींची संख्या 301 झाली आहे. तसेच बुधवारी करोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. दिवसभरात शहरातील 886 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 41 अशा एकूण 927 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. शहरातील एकूण करोनाबाधितांचा आकडा 13107 वर पोहोचला आहे.
बुधवारी रात्री उशिरा महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत 203 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत 8014 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर शहरातील 4885 आणि शहराबाहेरील 282 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. करोनाचा आकडा वाढत असतानाच गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. बुधवारी पहिल्यांदाच गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांची संख्या तीनशे पार गेली आहे. बुधवारी शहरात 302 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचे डॅशबोर्डवर दर्शविण्यात आले.
एका आठवड्यात 113 मृत्यू
15 जुलै ते 22 जुलै या एका आठवड्याच्या काळात करोनामुळे शहरातील व शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 113 रुग्णांना आपले प्राण गमावावे लागले. तर या एका आठवड्यात 4504 नव्या रुग्णांची भर पडली आहे. करोनाचे वाढते आकडे आणि मृत्यूंची संख्या चिंतादायक पातळीवर पोहोचली आहे.