पिंपरी – पिंपरी – संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेजवळ उभारलेल्या 11 मजली इमारत उभारली जाणार आहे. या इमारतीत रुग्णांच्या नातेवाइकांना रात्री राहण्यासाठी सोय करण्यात येणार आहे. अकरा मजल्यांच्या या इमारतीत केवळ एकाच मजल्यावर रुग्णाच्या 77 नातेवाईकांसाठी राहण्याची सोय असणार आहे. तर कार पार्किंगसाठी बेसमेंट, पहिला आणि दुसऱ्या मजल्यावर व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर मजल्यांवर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी प्रशिक्षण केंद्र व अन्य सुविधा दिल्या जाणार आहेत. वायसीएम रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गोर-गरीब रुग्ण जिल्ह्यातून व आसपासच्या जिल्ह्यातून भरती होत असतात. आर्थिक स्थिती ठीक नसल्याने या गरीब रुग्णांच्या नातेवाइकांना बऱ्याचदा वॉर्डाच्या बाहेर झोपावे लागते. वायसीएममध्ये दररोज आंतररुग्ण विभागात उपचारासाठी दाखल 550 ते 600 रुग्ण दाखल होतात. परंतु सोय मात्र केवळ 77 रुग्णांच्या नातेवाइकांसाठी करण्यात आली आहे. अतिदक्षता विभाग वगळता प्रत्येक रुग्णासोबत एका नातेवाईकाला बेडशेजारी थांबता येते. मात्र, बऱ्याचदा रुग्णाचे नातेवाईक वॉर्डच्या बाहेर पहुडलेले दिसतात. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठीच सध्या रुग्णालय व्यवस्थापनाने रात्रनिवाऱ्याची सोय करण्याचे नियोजन केले आहे. नव्या इमारतीत तळमजल्यावरील रात्रनिवाऱ्यात 77 नातेवाइकांची राहण्याची सोय असणार आहे. अकरा मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, अन्य कामे पूर्ण होण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. इमारतीत बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी आणि बीएससी नर्सिंगच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर बीएससी नर्सिंग, बीपीएमटी कोर्सची सुविधा असणार आहे. तर पाचव्या मजल्यावर सर्व्हिस फ्लोअर, सहाव्या मजल्यावर डायनिंग व ग्रंथालय, सातव्या मजल्यावरही ग्रंथालय असणार आहे. आठव्या, नवव्या आणि दहाव्या मजल्यावर हॉस्टेल असेल. अकराव्या मजल्यावर व्याख्यान कक्ष असणार आहे. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये 34 कार पार्किंगची सोय असेल. पहिल्या मजल्यावर 33 आणि दुसऱ्या मजल्यावर 33 कार पार्किंगची सोय असणार आहे. 2019 मध्ये इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. लॉकडाऊनच्या कालावधीत जवळपास दीड वर्ष काम बंद होते. वायसीएममधील अतिदक्षता विभाग वगळता प्रत्येक रुग्णासोबत एका नातेवाईकाला बेडशेजारी थांबता येते. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठीच सध्या रुग्णालय व्यवस्थापनाने नवीन इमारतीत रात्रनिवाऱ्याची सोय करण्याचे नियोजन केले आहे. – डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय व पदव्युत्तर संस्था.