पिंपरी | शेअर ट्रेडींगचे नावाखाली फसवणूक करणार्या तिघांना अटक

पिंपरी, (प्रतिनिधी) – शेअर ट्रेडींगचे नावाखाली महिलेची १८ लाखांची फसवणूक करणार्या तिघांना पोलिसांनी मुंबईतून अटक केली. पिंपरी चिंचवड सायबर विभागाने ही कारवाई केली. अश्वीन शेट्टी ऊर्फ अश्वीन नारायण शेरगर, नसीर अब्दुल सय्यद (वय ३६, दोघेही रा. मिरारोड, ता.जि. ठाणे), विरेंद्र राजेंद्रप्रसाद राय (वय ३२, रा. भाइंदर, ता.जि. ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेने फसबुकवर शेअर ट्रेडींगबाबत आलेल्या जाहीरातीमधील लिंक ओपन केली. त्या महिलेस एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. त्यानंतर गुंतंवणुक केल्यास २५ ते ३० टक्के नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून १८ लाख १२ हजार ४३६ रुपये भरण्यास भाग पाडले.
या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेलमार्फत करण्यात येत होता. सहायक निरीक्षक प्रविण स्वामी यांनी गुन्हयासाठी वापरलेल्या बँक अकाऊंटची माहिती घेतली असता ते खाते मुंबईतील अश्वीन शेट्टयाचे असल्याचे निदर्शनास आले. त्याने फसवणुकीच्या रक्कमेतून युएसडीटी ही क्रिप्टोकरन्सी विकत घेतली होती.
त्यानुसार सायबर विभागाचे पथक मुंबईत गेले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांचा साथीदार सलमान व अभि (रा. दुबई) यांच्या संगनमताने केला असल्याची कबुली दिली. अटक आरोपींकडून ४ लाखांची रोकड, ७ मोबाइल हस्तगत केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदिप डोईफोडे, स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, रविंद्र पन्हाळे, अंमलदार अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, दिपक भोसले, सचिन घाडगे, अभिजीत उकिरडे, अशोक जवरे यांच्या पथकाने केली आहे.





