मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका? ‘झेड प्लस’ सुरक्षेची मागणी

धुळे – मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा आमरण उपषण केले. पहिल्यांदा सरकारच्या आश्वासनानंतर 17व्या दिवशी उपोषण मागे घेतले तर सरकारने दिलेल्या मुदतीत मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले होते.
नऊ दिवसानंतर त्यांनी काल गुरुवारी आमरण उपोषण सोडले. यावेळी त्यांनी सरकारला पुन्हा दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी धुळे शहरातील मराठा समाज बांधवांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्यांनी ही मागणी केली.
उपोषण मागे घेतल्यानंतर सध्या जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे मराठा समाज बांधवांचे साखळी उपोषण सुरुच असून धुळ्यात आज मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
तसेच उपोषण मागे घेतले असले तरीही अद्याप महाराष्ट्रात ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच आहे. शासनाने वेळ मागितला म्हणजे आरक्षण मिळालेच पाहिजे, आंदोलन थांबले म्हणजे आक्रोश थांबला असे होत नाही, त्यामुळे सरकारने गांभीर्याने या प्रश्नाकडे बघावे, असे त्यांनी सांगितले.
कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण देईल – मुख्यमंत्री शिंदे
दरम्यान, जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच सरकार पुढच्या दोन महिन्यात ठरवलेले सगळे काम पूर्ण करेल. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्याचप्रमाणे ज्यांच्या कुणबी नोंदी आढळून येतील त्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र लगेच देण्यात येईल. पण जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आणि त्यांच्या याच मागणीवर सरकार कामाला लागले आहे.




