मुंबई : मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची निनावी धमकी ई-मेलद्वारे प्राप्त झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. हा ई-मेल सकाळच्या सुमारास रुग्णालय व्यवस्थापनाला प्राप्त झाला. यानंतर पोलीस प्रशासन आणि रुग्णालय व्यवस्थापन तातडीने सतर्क झाले. रुग्णालय परिसर रिकामा करून सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या. मुंबई पोलिसांच्या अनेक पथकांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच बॉम्ब नाशक पथक आणि श्वान पथकही तातडीने दाखल झाले. परिसरातील प्रत्येक विभागाची बारकाईने तपासणी केली जात आहे, तर सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण रुग्णालयाच्या परिसरात सखोल शोधमोहीम राबवण्यात आली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, धमकी पाठवणाऱ्याची ओळख पटवण्यासाठी सायबर सेलकडून तांत्रिक तपास सुरू आहे. यामध्ये ई-मेलच्या सर्व डिजिटल ट्रेलची पडताळणी, इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) तपासणी, तसेच संभाव्य सुसंगत पुराव्यांचा अभ्यास केला जात आहे. पोलिसांचा अंदाज आहे की ही धमकी खोडसाळपणाच्या उद्देशाने आहे की मोठ्या कटाचा भाग आहे, याबाबत लवकरच निष्कर्ष निघेल, अशी माहिती त्यांनी दिली.