खळबळजनक ! मलेशियाचे विमान उडवून देण्याची धमकी.. ऑस्ट्रलियाच्या प्रवाशाला अटक

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातून मलेशियाला जाणारे विमान उडवून देणाची धमकी दिल्यामुळे एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. मुहम्मद आरिफ असे या प्रवाशाचे नाव असून सोमवारी सिडनी विमानतळावरून कुआलालांपूरला जाण्यासाठी निघालेल्या मलेशिया एअरलाइन्सच्या विमानामध्ये हा प्रवासी होता. त्याने विमान उडवून देण्याची धमकी दिल्यामुळे विमान पुन्हा सिडनीला आणण्यात आले. विमानतळावरच पोलिसांनी या प्रवाशाला अटक केली.
विमानाने उड्डाण केल्यापासून आरिफ हा विमानात गोंधळ घालत होता. आपल्याकडे स्फोटके असून विमान उडवून देण्याची धमकी तो देऊ लागला होता. अशाप्रकारे खोटी वक्तव्ये करून धमकी देणे हे सुरक्षा विषयक नियमांच्याविरोधात असून या गुन्ह्याबद्दल या प्रवाशाला 10 वर्षांची शिक्षा आणि 15 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर इतका दंड होऊ शकतो.
आरिफला गंभीर मानसिक समस्या आहेत आणि तो मानसिक स्थितीत नव्हता, असे आरिफचे वकील मोस्तफा दाऊदी यांनी न्यायालयात सांगितले. मात्र न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला आहे. या विमानामध्ये 199 प्रवासी आणि 12 कर्मचारी होते.





