प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा पोलिसांनी ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. मुंढवा येथे राहणाऱ्या व्यवसायिकाला अनोळख्या मोबाईल क्रमांकावरून सतत व्हॉट्सअॅप कॉल्स येत होते. कॉल करणारा व्यक्ती वारंवार म्हणत होता की, तू खूप पैसे कमावलेस, मला ५० लाख रुपये हवेत, नाहीतर मी तुझा खून करीन. आरोपीला अटक केली, तेव्हा तपासात धक्कादायक बाब समोर आली. आरोपी हा तक्रारदाराच्या शेजारीच राहणारा निघाला. तेथून तो तक्रारदाराच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून वारंवार धमकी देत होता. आरोपीने कमी वेळात श्रीमंत होण्यासाठी ही ५० लाखांची खंडणी मागितली होती. आरोपीचे नाव अनिकेत अनिल पावल (२४, रा. भीमनगर, घोरपडी, पुणे) असे आहे. तक्रारदार राजू तपशीर खान (४३, रा. मुंढवा) हे गेल्या २० वर्षांपासून मुंढवा औद्योगिक भागात लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. त्यांच्या अधिपत्याखाली सुमारे ४० मजूर कार्यरत आहेत. त्यांना अनोळख्या क्रमांकावरून पहिला व्हॉट्सअॅप कॉल आला. सुरुवातीला नेटवर्कमुळे संभाषण होऊ शकले नाही, परंतु नंतर आरोपीने पुन्हा कॉल करून धमकी दिली की, मला उद्या ५० लाख रुपये हवेत, माझी माणसं पैसे घेण्यासाठी येतील, नाही दिले तर मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारीन.या धमक्यांमुळे तक्रारदाराला कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवत असल्याचा संशय आला. दोन दिवस आरोपीकडून अशाच धमकीच्या कॉल्स आणि मेसेजेस येत राहिले. कधी २० लाख रुपये आधी दे, उरलेले नंतर बघू म्हणत असे, तर कधी म्हणत असे, तुझी छोटीशी चूक तुला महागात पडेल, मी तुझा मर्डर करीन. पीडिताने ही माहिती आपल्या नातेवाईक व परिचितांना सांगितली आणि शेवटी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन २९ जुलैच्या रात्री तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे आणि पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक तपास करताना असे लक्षात आले की, कॉल केल्यानंतर आरोपी आपला फोन बंद करून पळून जात असे. गुप्त माहिती व स्थानिक बातमीदारांच्या मदतीने पोलिसांना समजले की, आरोपी घोरपडी भागात पीडितास भेटण्यासाठी येणार आहे. पोलिसांनी घोरपडी परिसरात सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले.