पिंपरी | ‘व्हीपीएन’चा वापर करुन धमकीचे मेल

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील तीन हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या संशयितांनी व्हीपीएन पद्धत वापरून मेल केला. या अत्याधुनिक पद्धतीमुळे पोलीस देखील चक्रावले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी थेट गुगलकडे धाव घेतली आहे.
निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धन्वंतरी रुग्णालयात बॉम्ब ठेवला असल्याचा रविवारी (दि. 18) सायंकाळी मेल आला. त्यामुळे रुग्णालयात चांगलीच धावपळ उडाली. रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली.
बॉम्ब शोधक नाशक पथकाने रुग्णालयाचा परिसर पिंजून काढला. मात्र त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. अशाच प्रकारे शहराच्या भोसरी परिसरातील मेडिक्लोवर आणि चिंचवड येथील मोरया या रुग्णालयांना देखील अशाच प्रकारचा मेल प्राप्त झाला. तिथेही पोलिसांनी तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
काय लिहिले धमकीच्या मेलमध्ये?
धमकीच्या मेलमध्ये एका दहशतवादी संघटनेचे नाव वापरण्यात आले आहे. ‘मी हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवला आहे. हे बॉम्ब हॉस्पिटल मधील बेड आणि बाथरूम मध्ये ठेवले आहेत. हॉस्पिटल मधील एकही व्यक्ती जिवंत राहणार नाही. यामागे दहशतवादी चिंग आणि कल्टीस्ट यांचा हात आहे’ असा मेलमध्ये मजकूर आहे.
निगडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
धमकी प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात [email protected] या मेल धारक अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुधीर रंगराव पाटील (वय 71, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.
देशभरात 50 ते 60 ठिकाणी एकच धमकी
अज्ञात मेलधारकाने देशभरातील नामांकित हॉस्पिटल, शाळा, मॉल मध्ये बॉम्ब असल्याबाबत धमकीचे 50-60 जणांना मेल पाठवले आहेत. पुणे शहरातील नोबेल रुग्णालय आणि फिनिक्स मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल पुणे पोलिसांना मिळाला होता.
व्हीपीएन म्हणजे काय?
व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) हे सायबर सुरक्षेसाठी बनविण्यात आलेले नेटवर्क असते. आपले संगणक, मोबाइल अथवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट सायबर हल्ल्यापासून सुरक्षित राहण्यासाठी हे नेटवर्क तयार केले जाते.
मात्र काही लोक याचा दुरुपयोग करून इतरांना धमकीचे मेल पाठविणे, मेसेज करणे अशी कामे करतात. यामुळे मेल, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा आयपी ॲड्रेस समोरच्या व्यक्तीला सहजासहजी सापडत नाही.
शहर पोलिसांनी ठोठावला गुगलचा दरवाजा
हॉस्पिटल धमकी प्रकरणातील संशयित आरोपींनी ‘व्हीपीएन’ नेटवर्क वापरले असल्याने संबंधित वापरकर्त्याचा आयपी ॲड्रेस जाणून घेण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी थेट गुगलकडे धाव घेतली आहे.
संबंधित मेल पाठवणाऱ्या संगणकाचा नेमका आयपी ॲड्रेस काय आहे, तो कुठून पाठवण्यात आला आहे, याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुगलकडे मागितली आहे.




