राजगुरुनगर -खेड तालुक्यात 24 तासांत तब्बल 43 व्यक्तीचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून तालुक्याची करोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 975 वर झाली आहे. अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. खेड तालुक्यात करोनाबाधित व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. आजही 43 जण पॉझिटिव्ह सापडल्याने तालुक्यात करोनाची भीती वाढतच आहे. ग्रामीण भागात करोनाने हातपाय पसरले असून नवीन गावे बाधित होत आहेत. चाकण आणि चाकण परिसरातील सर्वाधिक गावांचा यामध्ये समावेश आहे. आमआयडीसी आणि पुण्याजवळ असलेल्या या गावांमध्ये करोना संक्रमित झाला आहे. ज्या गावांमध्ये कामगारांची संख्या जास्त आहे त्या गावांमध्ये करोना बाधित व्यक्तींची संख्या जास्त आहे. खेड तालुक्यात मागील 24 तासांत चाकण 8, आळंदी 3, राजगुरुनगर 5 अशा तीन नगर परिषदांमिळून 16 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील सोळू 2, चऱ्होली खुर्द 5 , वडगाव घेनंद 2, शेलगाव 1, शेलपिंपळगाव 1, रासे 1, मांजरेवाडी पिंपळाची 1, सांडभोरवाडी 3, शिरोली 1, जऊळके खुर्द 1, खराबवाडी 3, मेदनकरवाडी 2, नाणेकरवाडी 3, म्हाळुंगे 1 या 14 गावातील 27 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.