आत्महत्येचे विचार मनात यायचे – शमी

नवी दिल्ली – बीसीसीआयने नाकारलेला करार, दुखापती व त्याचवेळी झालेले कौटुंबिक कलह असह्य झाले होते. त्यावेळी मानसिकता इतकी नकारात्मक बनली होती की अनेकदा आत्महत्येचा विचार मनात येत होता, असा गौप्यस्फोट भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज महंमद शमी याने केला आहे.
पत्नी हसीन जहानबरोबर झालेले वाद, कलह यांमुळे मनावर खूप तणाव होता. त्यातच दुखापतही झाल्याने संघातून बाहेर राहिलो होते. पत्नीने आपली पोलिसांकडे तक्रार केल्याने माझ्या विरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदला गेला होता. नावावर असे बालंट आल्याने बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून मला वगळले होते. त्यावेळी मानसिकता इतकी नकारात्मक बनली होती की आपले जीवनच संपवावे असे वाटायचे. मात्र, त्याचवेळी माझ्या घरच्यांनी मला समजुन घेतले, पाठिंबा दिला.
माझ्या आनंदासाठी सगळेच तत्पर असायचे. यामुळे खरेतर मी आत्महत्येचा विचार सोडला व मनाशी निग्रह केला की या परिस्थितीतून बाहेर यायचे व तसेच घडले, असेही शमी म्हणाला. 2015 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत दुखापत झाली होती. त्यामुळे संघातील स्थान गमवावे लागले होते. त्याचवेळी कौटुंबिक प्रश्नही निर्माण झाले होते. पत्नीने मारहाणीचा गुन्हा नोंदविल्याने बीसीसीआयनेही करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून वगळले होते.





