अयोध्या: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन देऊ इच्छिणारे कार्यकर्ते, नेते आणि शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आज आपापल्या घरीच रोखण्यात आले. आदित्यनाथ आज अयोध्येचा दौरा करणार असल्याने शाळांच्या वाढीव शुल्काबाबतचे निवेदन त्यांना देण्याचा निर्णय अनेक कार्यकर्त्यांनी घेतला होता.
मात्र या सर्वांना आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी जाऊ देण्यात आले नाही. उलट त्यांना आपापल्या घरीच रोखण्यात आले. हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष मनीष पांडे, जिल्हा पालक समितीचे अध्यक्ष नवाब सिंग, धरम सेनेचे अध्यक्ष संतोष दुबे आणि कॉंग्रेसचे स्थानिक नेते शरद शुक्ला यांना त्यांच्या घरी ताब्यात घेण्यात आले, असे अयोध्याचे पोलीस उपअधीक्षक अरविंद चौरसिया यांनी पीटीआयला सांगितले.
लॉकडाऊनच्या कालावधीतील शालेय शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचे या सर्वांनी ठरवले होते. लॉकडाऊनमुळे सर्व पालकांची आर्थिक स्थिती बिघडलेली असल्यामुळे हे शुल्क माफ करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.
अयोध्येमध्ये बहुतेक पालकांचे पाल्य उद्योग समूहांच्या मालकीच्या खासगी शाळांमध्ये शिकत आहेत. हे सर्व पालक लघुउद्योजक आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे, असे पांडे यांनी सांगितले.