पुणे – करोनाचा रुग्ण आढळलेल्या परिसरात घरोघरी जाऊन महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी नेण्यात आलेल्या सुमारे 550 ते 600 कर्मचाऱ्यांनी जीवाच्या भीतीपोटी कामासाठी नकार दिला आहे. तर, ही ड्युटी रद्द करण्यासाठी काहींनी राजकीय दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना बुधवारी नोटीस बजावण्यात आली असून खुलासा न केल्यास या सर्वांचे निलंबन केले जाणार आहे.
परदेशातून 1 मार्चनंतर पुण्यात आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण तसेच ज्येष्ठ नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पालिकेने 525 पथके नेमली असून त्यात प्रत्येकी 3 ते 5 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, यातील केवळ 325 पथकेच कार्यरत असून उर्वरित कर्मचाऱ्यांनी या सर्वेक्षणाच्या कामास नकार दिला आहे. त्यासाठी हे कर्मचारी प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा दबाव आणत असल्याचे पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अनिल मुळे यांनी स्पष्ट केले.