प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्यांवर गाव विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करून 5 हजार रुपये दंड आकारण्याचा व कचरा टाकणार्याचा फ्लेक्स व व्हिडीओ प्रसिद्ध करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे, अशी माहिती उपसरपंच नसीर पठाण यांनी दिली आहे.कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची ग्रामसभा मंगळवारी (दि. 29) पार पडली. यावेळी कदमवाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, सलिमा पठाण, सुनंदा काळभोर, सिमिता लोंढे, मंदाकिनी नामुगडे, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्यांवर वरील प्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित या निर्णयाची अंमलबजावणी करून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यात येत असलेल्या ठिकाणी या कारवाईचे फ्लेक्स लावले आहेत. चार महिन्यांपासून कदमवाकवस्ती ग्रामपंचायत व स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ओला-सुका कचरा संकलन व घनकचरा व्यवस्थापन करीत आहे. घरोघरी जावून कचरा संकलन, वर्गीकरण व व्यवस्थापन करण्यात येत आहे. प्रत्येक घरासाठी 60 रुपये व हॉटेल व्यावसायिकांना 150 रुपये मासिक शुल्क आकारले जात आहे. कचरा संकलनामुळे थोड्याच दिवसात कदमवाकवस्ती गाव कचरा मुक्त होऊन स्वच्छ होणार होते; मात्र काही नागरिक या योजनेत सहभागी होत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या संदर्भात घेतलेला हा निर्णय योग्य आहे. आपले गाव स्वच्छ ठेवणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तुम्हाला कामामुळे कचरा वेचकांकडे कचरा देणे शक्य नसेल तर कचरा घराबाहेर डस्टबिनमध्ये ठेवा. कचरा वेचक घेऊन जातील. अन्यथा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्यावर गाव विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कचरा टाकणार्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात येईल. -चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच