तोतयागिरी करून मुख्यमंत्री झालेल्यांना बाळासाहेबांच्या स्मारकात स्थान नाही – उद्धव ठाकरे

मुंबई – मुंबईत आज बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक कसे असेल याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो असतील मात्र पक्षाच्या नावावर तोतयागिरी करून मुख्यमंत्री झालेल्यांचा फोटो असणार नाही, असे म्हणत ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला.
ठाकरे म्हणाले, 17 तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा दहावा स्मृतीदिन आहे. स्मारक नेमकं कधी आणि कसे होणार याबद्दल कुतूहल आहे. आजचे हे सादरीकरण प्राथमिक स्वरुपाचे आहे. या सादरीकरणाव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी आपण तिथे करणार आहोत. हे म्युझियम प्रेरणा स्थान असणार आहे. काहींना वाटत आहे की वेळ लागतोय, मात्र ती हेरिटेज वास्तू आहे. त्या वास्तूला धक्का न पोहोचवता काम करत आहोत. बाजूला समुद्र आहे त्यामुळे जमिनीखाली देखील बांधकाम करावे लागत आहे. यावेळी आदित्य ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेतील दिग्गज नेते उपस्थित होते. महापौर बंगल्यात हे स्मारक तयार करण्यात येत आहे.
सुभाष देसाई यांनी सांगितले की, प्रशासकीय इमारत बांधून झाली आहे. पहिल्या टप्प्याचे काम जानेवारीमध्ये पूर्ण होईल. आत्तापर्यंत 58 टक्के काम झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण करत असताना एकही झाड तोडले नाही. ऑक्टोबर 2023 पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल.
असं असणार स्मारक
तळघरात बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास दाखवण्यात येणार आहे. जुना महापौर बंगला हे आत्ताचं बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक असणार आहे. बाळासाहेबांनी लिहिलेली पत्रं, भाषणं आणि फोटो असणार आहेत. तसेच बाळासाहेबांनी काढलेल्या कार्टुनसाठी वेगळा कक्ष आहे. मार्मिकचे अंक स्मारकात असणार आहेत. बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाचा पहिला नारळ वाढवून शुभारंभ केला ती खास आठवण या स्मारकात असेल. पक्षाची आतापर्यंतची वाटचाल दाखवण्यात येईल. जवळपास एक हजार लोकं एकावेळी स्मारक पाहू शकतील.





