एकाच इमारतील 109 जण होते बाधित
पुणे – भवानी पेठ परिसरातील मंजुळाबाई चाळ एसआरए इमारत करोनामुक्त झाली आहे. या इमारतीत तब्बल 109 जणांना करोनाची बाधा झाली होती. मात्र, या सर्वांनी करोनावर मात केली आहे.
शहरात एकाच इमारतीत इतक्या मोठ्या प्रमाणात करोनाबाधित आढळल्याची ही पहिलीच घटना ठरली आहे. या चाळीत करोनाचा अखेरचा बाधित दि. 18 मे रोजी सापडला होता, अशी माहिती ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांनी दिली.
एका खासगी रुग्णालयात आया असलेल्या महिलेमुळे या चाळीत करोनाचा प्रसार होता. येथील 4 इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यातील एका इमारतीत सुमारे 251 घरे असून, सुमारे 1054 नागरिक राहत होते. ही महिला करोना बाधित झाल्यानंतर महापालिकेने या महिलेचे “कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ केले असता, सुमारे 196 जणांची माहिती समोर आली. त्यामुळे पालिकेने आठवडाभरात येथून तब्बल 772 जणांचे नमुने तपासणी केली. त्यात तब्बल 109 जण बाधित आढळले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने सर्व कुटुंबांना शेजारच्या इमारतीत विलगीकरणात ठेवले.
विशेष अधिकारी सौरभ राव यांनी आराखडा तयार करून त्याची अंमलबजवाणी करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाकडे सोपवली होती. मात्र, आता 18 मेपासून येथे एकही बाधित आढळलेला नाही.