पारनेर – पारनेर तालुक्यातील आठ करोना संशयितांना 14 दिवस भाळवणी येथील केंद्रात क्वॉरंटाईन केल्यानंतर आज त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र त्यांना पुढील 14 दिवस घरातच होम क्वारंटाईन राहण्याचे सांगण्यात आले आहे. भाळवणी येथे क्वॉरंटाईन व्यवस्था करण्यात आली होती, मात्र त्यांना करोनाची लक्षणं आढळून न आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तालुक्यातील करोना संशयित असलेल्या 22 लोकांची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असले तरी काळजी म्हणून 14 जणांना भाळवणी येथे केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांना आज घरी सोडण्यात आले. या आठ जणांना घरी पुन्हा चौदा दिवस होम कॉरंटाईन करण्यात येणार असून त्यावर प्रशासन बारीक लक्ष ठेवणार आहे. अशा लोकांबाबत माहिती आरोग्य विभागास कळवावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी केले. या आठजणांना शासकीय रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले. प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, आरोग्याधिकारी प्रकाश लाळगे व सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.*-