दोन महिन्यांत सापडले फक्त 47 रुग्ण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत अवघे 1 टक्के रुग्ण पुणे – महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये नागरिकांनी स्वयंशिस्तीने पाळलेल्या लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांच्या कालावधीत फक्त 47 करोनाबाधित आढळून आले. तर त्यातील चार जण हे शहरातील कंन्टेन्मेंट झोनमधून गुपचूप बाहेर जाऊन या गावांत राहिल्याने मागील 15 दिवसांत या गावांमध्ये सुमारे 22 रुग्ण वाढले आहेत. या 11 गावांची लोकसंख्या तब्बल 3 लाखांवर आहे. मात्र, एका बाजूला शहरात कडक लॉकडाऊन असतानाही, या गावांमधील नागरिकांनी दाखविलेली स्वयंशिस्त आणि प्रशासकीय यंत्रणेच्या उपाययोजनांमुळे या भागात करोनाचा प्रसार रोखला गेला आहे. 2017 च्या अखेरीस महापालिका हद्दीत नवीन 11 गावांचा समावेश केला. या गावांमुळे महापालिकेचे क्षेत्रफळ सुमारे 81 चौरस किलोमीटरने वाढले तर या गावांमधील सुमारे अडीच लाख लोकसंख्या महापालिकेत समाविष्ट झाली आहे. याशिवाय, शहराच्या हद्दीजवळ असलेल्या या गावांमध्ये परराज्यातून आलेल्या मजूरांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे शहरात करोनाचा प्रसार वाढताना या गावांमध्येही संसग्र वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र, या गावांमध्ये वेळीच महापालिका प्रशासन आणि स्थानिकांकडून राबवलेल्या उपाययोजनांमुळे दोन महिन्यांत ही रुग्ण संख्या 47 वर गेली आहे. त्यातही सर्वाधिक 42 रुग्ण हे मागील दहा दिवसांत लॉकडाऊन शिथील केल्यानंतर सापडले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश रूग्ण हे शहरात अत्यावश्यक सेवांच्या कामांसाठी येत होते तर, काही शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात राहत होते. मात्र, त्या भागात लॉकडाऊन कडक केल्यानंतर या नागरिकांनी या भागातून बाहेर पडत या नवीन 11 गावांमधील नातेवाईकांकडे आधार घेतला. मात्र, त्या ठिकाणी ते करोनाबाधित झाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना बाधा झाली आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या पाहता या 11 गावांमध्ये अवघे 1 टक्के आहे. तातडीने खबरदारी घेतल्याने संसर्ग रोखण्यात यश 11 गावांसाठी एकच प्रभाग आहे. मात्र, हा शहराच्या निम्म्याहून अधिक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विभागलेला आहे. शहरात या गावांच्या हद्दीजवळ करोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना, या गावांच्या सीमा सील केल्या होत्या. तसेच, नागरिकही दक्षता घेत होते. त्यामुळे करोनाचा प्रसार रोखण्यात यश आले आहे. काही गावांत एक ते दोन रुग्ण आढळताच, तातडीने सर्व खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे संसर्ग रोखण्यात यश आले आहे.