राजगुरूनगर – खेड तालुक्यातील आरळा नदीवरील कळमोडी धरण मंगळवारी (दि. 11) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास 100 टक्के भरले आहे. गेली पाच वर्षे जुलै महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात भरणारे राज्यातील एकमेव धरण आहे. मात्र यावर्षी ते तब्बल एक महिना उशिरा भरले आहे. खेड तालुक्यातील कळमोडी धरण परिसरात आठ दिवसांपासून कमी जास्त पाऊस सुरू आहे. तर दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने आरळा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. धरणात 1.51 टीएमसी पाणीसाठा आहे. धरण भरल्याने त्यावरून सुमारे 500 ते 1 हजार क्युसेक वेगाने पाणी खाली पडत आहे. धरणातून पडणारे पाणी आरळा नदीतून खाली चास कमान धरणात जमा होत असल्याने चास कमान धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होणार आहे. चास कमान धरणात 30 टक्के साठा आहे. खेड तालुक्यातील कळमोडी धरण हे तिसरे धरण म्हणून नावारूपाला आले आहे. खेड आणि आंबेगाव तालुक्यासाठी या धरणातील पाण्याचा उपयोग होत आहे. तालुक्यातील खरपुड, भोमाळे, कुडे, घोटवडी, धामणगाव खुर्द, आंबेवाडी (मोरोशी)या डोंगर परिसरात पडणाऱ्या पावसामुळे आरळा नदी भरून वाहत आहे. कळमोडी धरण परिसरात आतापर्यंत सुमारे 570 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पर्यटन विकास आराखडा धूळखात कळमोडी धरणाची निर्मिती अतिशय निसर्गरम्यपरिसरात झाल्याने शहरी पर्यटक वर्षाविहार करण्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. या धरणावर शहरातील मोठ्या संख्येने दरवर्षी पर्यटक येत असतात. पर्यटन केंद्र म्हणून या परिसराचा विकास आराखडा बनविण्यात आला आहे. मात्र, त्यावर अजूनही कारवाई नाही हा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडून आहे. तथापी यावर्षी करोनाचे संकट असल्याने धरणावर येणाऱ्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. यावर्षी कळमोडी धरण क्षेत्रात पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे, त्यामुळे धरण एक महिना उशिराने भरले आहे. धरण भरल्याने परिसरातील शेतकरी समाधानी झाला आहे. भविष्यातील पाणीप्रश्न सुटणार आहे – संतोष गोपाळे, शेतकरी, कळमोडी