किट गिफ्टच्या स्वरुपात बाजारात दाखल
पिंपरी – बहीण-भावाच्या नात्याला दृढ करणाऱ्या रक्षाबंधनावर यंदा “करोना’चे सावट आहे. बहिणीचे करोनारुपी संकटातून रक्षण व्हावे, यासाठी परंपरागत गिफ्टच्या ऐवजी “करोना संरक्षक किट’ला मागणी वाढली आहे. आकर्षक गिफ्ट पॅकमध्ये या किट्स बाजारात उपलब्ध आहेत. परंपरागत गिफ्टबरोबरच बहिणींना करोनापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरु शकणारे सर्वसमावेशक करोना संरक्षक गिफ्ट व्हाऊचर बाजारात उपलब्ध झाले असून, त्याला भावांकडून चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.
सोमवारी (दि.3) साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणवारदेखील करोनाचा मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे बहिणीने ओवाळल्यानंतर तिला गिफ्ट म्हणून एखादी परंपरागत भेटवस्तू देण्याऐवजी विविध वस्तुंचा एकत्रित संच असलेला करोना संरक्षक किट बाजारात उपलब्ध झाले आहे. सोशल मीडियावर या किटचा मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे.
करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जगभरातील नागरिकांची जीवनशैली बदलली आहे. आहार आणि फिरण्यावर मर्यादा आल्या आहेत. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता सातत्याने हात स्वच्छ धुवणे, सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतून प्रवास टाळणे, फेसमास्क वापरणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु झाली आहे. नागरिकदेखील या नियमांचे पालन करत आहे. मात्र. सार्वजनिक ठिकाणी फेसमास्कचा वापर न करणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
काय-काय असते किटमध्ये
गिफ्ट पॅकमध्ये करोनापासून बचाव करणाऱ्या सर्व वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. याची किंमतही वाजवी आणि गरजही मोठी आहे. यामुळे याची मागणी सध्या वाढत आहे. या किटमध्ये शंभर मिली सॅनिटायझर, हॅंड वॉशच्या बाटल्या, कापडी हॅंड ग्लोव्हज, फेस मास्क, शुभेच्छा संदेश असणारे स्टीकर असतात. हे किट दोनशे ते तीनशे रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.