Satara : महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा ‘मधाचे गाव’ मांघरवर

सातारा : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची राजधानी दिल्ली येथे होणार्या भारत पर्व प्रदर्शनात महाराष्ट्राच्यावतीने देशातील पहिले ‘मधाचे गाव’ असलेल्या मांघर (ता. महाबळेश्वर) या गावावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. ज्या राज्यांच्या चित्ररथांना कर्तव्यपथावरील संचलनात संधी मिळत नाही, असे चित्ररथ लाल किल्ला परिसरात भरणार्या भारत पर्व प्रदर्शनात समाविष्ट केले जातात.
मांघर हे मधपालन करणार्यांचे गाव आहे. या गावातील प्रत्येक घरात मधपाळ असून, सातारा जिल्ह्यात मधाच्या एकूण उत्पादनापैकी दहा टक्के उत्पादन मांघरमध्ये होते. प्रारंभी गावातील लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांना मधपेट्या देण्यात आल्या. वन विभागाच्या साहाय्याने मधमाशीपूरक वनस्पतींची लागवड करण्यात आली. गावात मधमाशीचे मधुबन, माहिती दालन, प्रचार, प्रसिद्धी व विक्री केंद्र उभे राहिले आहे. गावात मध उत्पादन प्रशिक्षण केंद्रदेखील आहे.
लाल किल्ल्यावर होणार्या भारत पर्व प्रदर्शनातील चित्ररथात मधाचे गाव मांघरचा समावेश आहे. ही महाबळेश्वर तालुक्यातील मधउत्पादक शेतकर्यांसाठी अभिमानाची बाब आहे.
– संजय गायकवाड, अध्यक्ष, मधुसागर मधउत्पादक संस्था, महाबळेश्वर
मधाच्या गावाच्या निर्मितीसाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मोठी भूमिका बजावली. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, संचालक रघुनाथ नारायणकार यांनी पुढाकार घेतला होता.
स्मार्ट व्हिलेज
मांघर गावास देशातील पहिले मधाचे गाव होण्याचा सन्मान मिळाला आहे. राज्यात दरवर्षी 1.25 लाख किलो मधाचे उत्पादन होते. त्यातील 35 हजार किलो मधाचे उत्पादन महाबळेश्वर व आसपासच्या भागात केले जाते. मांघर गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. ‘स्मार्ट व्हिलेज’ असलेल्या मांघरने निर्मलग्राम, तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पर्यावरण विकासरत्न, एक गाव एक गणपती, लोकग्राम असे अनेक पुरस्कार पटकवले आहेत. 16 मे 2022 रोजी मांघरला देशातील पहिले मधाचे गाव असा मान मिळाला. गावात घरटी मधाचे उत्पादन घेतले जाते.





