मुंबई – मुंबईतल्या शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यासाठी दावा केल्याने तेथे नेमका कोणाचा मेळावा होणार हा निर्णय अधांतरी लटकलेला असतानाच शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक आयोजित करून आपलाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचा शंखनाद केला आहे. या मेळाव्यासाठी कामाला लागण्याची सुचनाही त्यांनी केली आहे.
सेना भवनात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी शिवाजी पार्कवर आपलाच दसरा मेळावा होईल, त्या विषयी कोणताही संभ्रम मनात ठेऊ नका, अशी सूचना त्यांनी केली. त्याच्या जय्यत तयारीला लागा, पक्षाच्या अन्य संघटनांनाही बरोबर घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या. पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला. ते म्हणाले की, हे फुटीर लोक तोतया आहेत. त्यांना त्यांची जागा आता जनतेकडूनच दाखवली जाईल असेही त्यांनी नमूद केले. फॉक्सकॉन प्रकल्पाबाबतही त्यांनी यावेळी प्रथमच भाष्य केले. ते म्हणाले की, हा प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्याचे खापरही आमच्यावरच फोडले जात आहे असे ते म्हणाले. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहवा यासाठी आपण खूप प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आम्हाला परवानगी मिळालीच पाहिजे – सुनील प्रभू
शिवसेना आणि दसरा मेळावा हे समीकरण गेली अनेक दशके सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक ऐतिहासिक सभा या शिवतीर्थावर झाल्या आहेत. त्यामुळे यंदाही आम्हाला हा मेळावा घेण्याची परवानगी मिळालीच पाहिजे असे शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की शिवसेनेच्या स्थापनेपासून आमची सभा होते आहे. मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक येथे येत असतात. विचारांची देवाणघेवाण होते. संस्कृतीचे जतन होते त्यामुळे सरकारने ही परवानगी दिलीच पाहिजे.