पुणे जिल्ह्यात यंदा 2,500 प्राण्यांची नोंद

आकडा वाढला : बुद्धपौर्णिमे रोजी करण्यात आली होती पाहणी

पुणे – बुद्धपौर्णिमेदिवशी करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या प्रगणनेत यंदा सुमारे 2,500 वन्यप्राण्यांची नोंद वनविभागाने केली आहे. या प्रगणनेत क्वचितच दिसणाऱ्या (रेअर स्पेसिज) काही प्राण्यांची देखील नोंद घेण्यात आल्याचे वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक आर.के. वानखेडे यांनी सांगितले.

जंगलातील प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ किंवा घट, एखादा नवीन प्रजातीचा प्राणी दाखल झाला आहे का, याच्या नोंदी घेण्यासाठी वनविभागातर्फे दरवर्षी बुद्धपौर्णिमेला प्राणी प्रगनणा केली जाते. यंदा दि.18 मे रोजी ही प्रगणना करण्यात आली. जिल्ह्यातील भीमाशंकर, मयुरेश्‍वर, रेहकुरी आणि माळढोक अभयारण्यामध्ये ही प्रगणना करण्यात आली. जिल्ह्यातील पाच अभयारण्यांमधील 170 पैकी 50 पाणवठ्यांवर ही प्रगणना करण्यात आली.

यंदा प्रगणनेत भिमाशंकर अभयारण्य येथे सुमारे 592 प्राणी, मयुरेश्‍वर येथे 414 प्राणी, रेहकुरी काळवीट अभयारण्य येथे 490 प्राणी, तर माळढोक पक्षी अभयारण्य येथे 998 प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सांबर, भेकर, पिसोरी, चिंकारा, काळवीट, वानर, रानडुक्कर, बिबट, लांडगा, कोल्हा, तरस आणि खोकड या प्राण्यांचा समावेश आहे.
वनविभागाने गतवर्षी केलेल्या प्रगणनेत सुमारे 2,297 प्राण्यांची नोंद करण्यात आली होती. यंदा हे प्रमाण 200 ने वाढले आहे.

याबाबत वानखेडे म्हणाले, “वन्यप्राण्यांबाबत माहिती मिळविण्यासाठी ही प्रगणना उपयुक्त असते. या प्रगणेत केली जाणारी प्राण्यांची नोंद ही अचूक नसली, तरी अभ्यासासाठी ती उपयुक्त ठरते. या गणनेतील अचूकता वाढावी, यासाठी सध्या बुद्धपौर्णिमेच्या 1 महिना आधीदेखील पाणवठ्यावरील नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे या प्रगणनेचा निश्‍चितच फायदा होतो.’

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×