या महिन्यात भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ल्याच्या तयारीत – कुरेशी

इस्लामाबाद – या महिन्यात 16 ते 20 एप्रिल दरम्यान भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे गुप्तचरांकडून खात्रीशीर वृत्त मिळाले आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभुमीवर मुलतानमध्ये पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

“काही घातपाताच्या घटना घडवल्या जाऊ शकतात. त्यातून भारताचा पाकिस्तानप्रती आक्रमकता दाखवली जाऊ शकते. जर तसे झाले, तर त्याचा भूभागातील शांततेवरचा परिणाम काय असेल, याचा अंदाज केला जाऊ शकतो.’असे कुरेशी म्हणाले. या गोपनीय माहितीबाबत पाकिस्तानने संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला आगोदरच कळवले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही या बेजबाबदार वर्तनाची दखल घ्यावी आणि भारताला अशा कृत्यापासून परावृत्त करावे, असे आपल्याला वाटत असल्याचेही कुरेशी म्हणाले.

भारताने 26 फेब्रुवारीरोजी केलेल्या “एअर स्ट्राईक’बाबत मौन बाळगल्याबद्दल कुरेशी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायावरही टीका केली. मात्र कुरेशी यांच्या वक्‍तव्याला पाकमधील विरोधी पक्षांनी गांभीर्याने घेतले नाही. पाकिस्तान पीपल्स पार्टीने आपले अपयश लपवण्यासाठी भारताला युद्धाची धमकी दिल्याबद्दल पाक सरकारलाच सुनावले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.