Russia-Ukraine war – रशिया आणि युक्रेन दरम्यान तात्काळ युद्धबंदी लागू व्हावी, अशी अपेक्षा अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. युक्रेनविरोधात रशियानेच युद्धबंदी लागू करावी, असाच त्यांच्या म्हणण्याचा रोख होता. अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर लगेचच आपण हे युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना प्राधान्य देणार असल्याचे ट्रम्प यांनी यापूर्वीच म्हटले होते. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच ट्रम्प यांनी युद्धबंदी लागू करण्यासाठी आतापासूनच दबाव वाढवायला सुरूवात केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि युक्रेनच्या जनतेला युद्धबंदीच्या निर्णयाचा आनंदच होईल. हा वेडेपणा थांबायला हवा, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष थांबावा, यासाठी युक्रेनला अमेरिकेकडून केल्या जात असलेल्या लष्करी मदतीत कपात केली जाईल आणि अमेरिकेला नाटोमधून बाहेर काढले जाईल, नाटोतील सहकारी आणि अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा समुदाय या दोन प्रमुख धोक्यांनी युक्रेनला घाबरवले आहे, असेही ट्रम्प यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. फ्रान्समधील नॉत्रे दाम कॅथेड्रल पुन्हा खुले करण्याच्या समारंभाच्यावेळी ट्रम्प आणि झेलेन्सकी यांची भेट झाली होती. ट्रम्प यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचे झेलेन्सकी म्हणाले. मात्र चर्चेचा तपशील देण्यास त्यांनी नकार दिला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर ट्रम्प आणि पुतीन यांच्यात कोणताही संवाद झालेला नाही.