प्रशासनाचे दुर्लक्ष : खराळआई उद्यानात
पिंपरी – रिकाम्या वेळात ज्येष्ठ नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानाकडे सर्वांचे पावले वळतात. उद्यानात जाऊन काही वेळ निवांत बसावे व दिवसभराचा थकवा घालावा यामागचा हेतू असतो. मात्र, निवांत जागा असणाऱ्या उद्यानात सुविधेअभावी असुरक्षित वाटू लागले आहे. खराळवाडी, पिंपरी येथील खराळआई उद्यानात समस्यांचे पीक चांगलेच फोफावले आहे. उद्यानाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की हे उद्यान आहे की जंगल असा प्रश्न पडू लागला आहे. उद्यानात मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने उद्यानात सापांचा वावर वाढला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यालयाच्या जवळच असलेल्या खराळवाडीतील खराळआई उद्यान आहे. मात्र, या उद्यानात गेल्यावर कोणीच उद्यान म्हणणार नाही, अशी अवस्था या उद्यानाची झाली आहे. उद्यानात मोठमोठे गवत वाढले आहे. तर, उद्यानात असलेल्या झाडांची छाटणी केली जात नसल्याने झाडे अवाढव्य वाढले आहे.
तर, उद्यानाच्या शेजारीच दगडाची खाण आल्याने येथून मोठे गवत वाढलेल्या उद्यानात मोठ्या प्रमाणात सापांचा वावर वाढला आहे. यामुळे उद्यानात येणाऱ्यामध्ये भिती निर्माण झाली आहे. उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी असल्याने मोठ्या संख्येने मुले उद्यानात येतात. मात्र, येथील सापांचा वावर आणि उद्यानाची झालेली अवस्था बघून स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खराळआई उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी ठेकेदाराकडे देण्यात आली आहे. मात्र, उद्यानात कुठलीही देखभाल होत नसून समस्याच समस्या दिसत आहे. उद्यानात पालक आपल्या पाल्यांना खेळण्यास जावू देत नाहीत. मात्र, लहान मुले खेळण्यासाठी पालकांची नजर चुकवून उद्यानात येतात.
मात्र, येथील सापांचा वावर बघता येथे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर, उद्यानाच्या प्रवेशद्वारा समोर सर्रास भंगार व वाहने लावण्यात येत आहे. यामुळे उद्यानात प्रवेश करण्यासाठी येथील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. याकडे पिंपरी-चिंचवड उद्यान विभागाने सर्रास दुर्लक्ष केले आहे. यामुळे करोडो रुपये खर्च करुन असल्या उद्यानाचा काय फायदा असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारु लागले आहे.
उद्यानाची देखभाल दुरुस्तीचे काम ठेकेदाराकडे दिलेले आहे. उद्यानाची तात्काळ पाहणी करुन उद्यानात काय समस्या आहेत, त्या सोडवण्यात येतील.
-दत्तात्रय गायकवाड, उद्यान अधीक्षक, उद्यान विभाग पिंपरी-चिंचवड महापालिका