Beed Police : बीडच्या पोलिस दलात करण्यात आला ‘हा’ बदल; 1 मार्चपासून होणार अंमलबजावणी

बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे बीड जिल्हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. हा हत्या प्रकरणी बीड पोलीस आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. यामध्ये बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवरदेखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. यानंतर आता बीड पोलीस दलाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची 1 मार्चपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
बीड पोलिसांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
बीड पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा प्रयत्न सुरू आहे. बीडच्या पोलिस दलात आडनावा ऐवजी पहिल्या नावाने बोलावण्याचा आदेश काढला होता. आता एक पाऊल पुढे टाकत प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलवर पहिल्या नावाची नेमप्लेट असणार आहे. याची अंमलबजावणी 1 मार्च पासून केली जाणार आहे.
का घेतला निर्णय?
पोलीस दलात देखील जातीवाद असल्याचे समोर आले आहे. आडनावा मुळे अधिकारी कर्मचाऱ्यांची जात लक्षात येते. तसेच सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलिसांची प्रतिमा डागाळली. हीच प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.





