‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताने 13 जणांचा मृत्यू; आप्पासाहेब धार्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘माझ्या कुटुंबातील…’

मुंबई – ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. केंद्रीय मंत्रि अमित शहा यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या 123 जणांना उष्माघाताचा त्रास झाला. तर त्यातील 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने या कार्यक्रमाला गालबोट लागले.
दरम्यान, या घटनेनंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पत्रक जारी करून दु:ख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे.
आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने
राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे.
दरम्यान, श्री सदस्यांचा मृत्यू हा राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे झाला असल्याची तीव्र प्रतिक्रिया विरोधी पक्षांकडून देण्यात आली आहे.






