होय, यानेच आमच्यासमोर मैत्रीणीचा गळा चिरला; न्यायालयातील साक्षी दरम्यान फिर्यादीने आरोपीला ओळखले

पुणे – एकतर्फी प्रेमातून बिबवेवाडी परिसरामध्ये १३ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा निर्घृण खून प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणातील आरोपीला फिर्यादिने ओळखले आहे. आरोपी शुभम ऊर्फ ऋषिकेश भागवत यानेच आमच्यासमोर मैत्रीणीचा गळा चिरल्याची साक्ष फिर्यादिने दिली. सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात, सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील हेमंत झंजाड यांनी न्यायालयामध्ये फिर्यादीची साक्ष नोंदविली.
शुभम हा दुचाकीवरून त्याच्या दोन अन्य साथीदारांसह घटनास्थळी आला. त्यावेळी, त्याठिकाणी गाडी पार्क करत तो पीडितेच्या दिशेने गेला. पीडितेने तू इथे का आलास अशी विचारणा करताच शुभम याने हातातील सुरा घेऊन पीडितेचे तोंड दाबत गळा चिरला. याखेरीज अन्य आरोपीनेही तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने आम्ही आरडाओरड करण्यास सुरवात केली.
त्यावेळी, आमच्या एका सहकार्याने शुभम याच्या हातातून चाकू हिसकाविला. त्यानंतर, त्याने पिस्तुल काढत पीडितेच्या मैत्रीणीच्या दिशेने रोखत जवळ आल्यास गोळी झाडण्याची धमकी दिली. भागवत याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पीडितेवर चाकूने सपासप वार केले. पीडितेचा जीव गेल्यानंतर आरोपीसह त्यांचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाल्याचे साक्ष फिर्यादी यांनी न्यायालयासमोर दिल्याची माहिती अॅड. झंजाड यांनी दिली.
आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. त्यालायेरवडा कारागृहातून न्यायालयात हजर करण्यात आले होते. १२ऑक्टोबर २०२१ रोजी बिबवेवाडी येथील एका लॉन्सवर हा प्रकार घडला. त्या मुलीने प्रेमास नकार दिला आणि फोनवर बोलण्यास टाळाटाळ केल्यामुळे शुभम ऊर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत (वय २२) याने क्रूर पद्धतीने तब्बल ४२ वार करून हा खून केला होता. या प्रकरणाची चर्चा विधानसभेतही झाली होती.





