जीवनगाणे: अतृप्तीची तहान

अरुण गोखले

माणसाच्या आयुष्याचं एक नाव आहे जीवन. त्या जीवनाचे जे जीवन आहे, त्याचे नाव आहे पाणी. पाणी प्राणी आणि प्राणिमात्रांचे जीवन ही एक फार महत्त्वाची आणि परस्परांवर अवलंबलेली साखळी आहे. “जल है तो जीवन हैं।’ किंवा “जल है तो कल हैं।’ या संदेशाची पाण्यासंदर्भातली जनजागृती करणारी वाक्‍ये सध्या स्मार्ट सिटीच्या भिंतीवर आपण पाहतोही.

पाणी आणि तहान ह्याचे अतूट नाते आहे. पाणी पाहिले की तहान लागते आणि तहान लागल्यावर ती पाण्याची तहान एका पाण्याशिवाय अन्य कशानेही भागत नाही. तहान हा शब्द सुद्धा मानवी जीवनाशी फार मोठे सख्य साधून आहे. माणसाला जीवनात तहान ही लागलेलीच आहे. ती तहान केवळ पाण्याचीच नाही तर अनेक प्रकारची आहे. विशेष गोष्ट म्हणजे या तहानेच्या संकल्पनेला तृप्तीचे वरदान नाही, तर उलट अतृप्तीचाच शाप आहे. आणि तहानेचा हा अतृप्तीचा शापच माणसाला अशी वेगवेगळी तहान भागवण्यासाठी आशेच्या मृगजळामागे आयुष्यभर धावायला लावतो.

माणसाला कशाची तहान नाही म्हणून सांगायचे! त्याला पाण्याच्या तहाने बरोबरच प्रेमाची, धनसंपत्तीची, मानसन्मानाची, अधिकाराची, सत्तेची, प्रतिष्ठेची सुद्धा विलक्षण अशी तहान लागलेली आहेच. जो तो आपली ती तहान भागवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा, साधनांचा वापर करीत आहे. पण मुळातच ज्या तहानेला अतृप्तीचा कठोर शाप मिळालेला आहे तिच्या पूर्ततेसाठी प्रसंगी तीच तहान त्याला त्याची मळलेली पाऊलवाट सोडून वाममार्गाने चालायला लावते.

हे असे होऊ नये यासाठी प्रत्येकानेच सावध असणे फार महत्त्वाचे आहे. तहान मग ती कशाचीही असो तिला अतृप्तीचा शाप आहे हे लक्षात घेऊन त्यावर काहीतरी उपाय शोधणे हे फार आवश्‍यक असते. नाहीतर त्या तहानेच्या पूर्ततेपायी आपल्या जीवनाचे वाळवंट व्हायला वेळ लागत नाही.

ज्यांचा जीव खऱ्या अर्थाने या तहानेच्या अतृप्तीने कळवळला आहे. ज्यांच्या घशाला खरी कोरड पडली आहे, पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली तहानच पिऊन टाकली आहे, असे द्रष्टे साधूसंत, सत्पुरुष आपल्याला एक सुंदरसा साधा अन्‌ सोपा उपाय देतात.

ते म्हणतात “हे माणसा! तू तुझ्या जीवनातली प्रत्येक तहान ही संतोषाच्या पेल्यातून भागविण्याचा सराव कर. संतुष्टता आणि संतोष ह्यानेच तू तुझ्या अतृप्त तहानेला जिंकू शकतोस.’

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×