मार्चअखेर तिसरी लाट संपुष्टात : राजेश टोपे

जालना – राज्यात काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग होण्याचा वेग मंदावला असून रुग्णसंख्येतही सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जनजीवनही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सद्यपरिस्थिती पाहता राज्यात तिसरी लाट ओसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याच आधारावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तिसरी लाट संपेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
जालन्यातील एका कार्यक्रमाला राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राजेश टोपे म्हणाले, दोन दिवसांखाली राज्यातील करोना परिस्थितीवर मंत्रीमंडळाची आढावा बैठक झाली. गेल्या काही दिवसांत राज्यातील करोना आकडेवारीमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे.
राज्यात 48 हजार दैनंदिन रुग्णसंख्या आढळणारी आता दहा ते 15 हजारांवर आली आहे. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळत होती, तिथेही रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि रायगड यासारख्या जिल्ह्यात रुग्ण कमी झाले आहेत.
मुंबईसारख्या मोठ्या शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या पाचशे-सहाशेवर आली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांचा ग्राफ कमी होत आहे. त्यामुळे असे वाटतेय की, मार्च महिन्यापर्यंत आपण राज्यातील करोनाची तिसरी लाट ओसरेल, असेही त्यांनी सांगितले.
निर्बध टप्प्याटप्प्याने हटविणार
सध्याच्या परिस्थितीत कोणतेही निर्बंध वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार नाही. शासनाचा कल निर्बंध कमी करण्याकडे आहे. दर आठवड्याला निर्बध टप्प्याटप्याने कमी झालेले पाहायला मिळतील. राज्यात लावण्यात आलेल्या सर्व निर्बंधावर बैठकीत चर्चा झाली. काही ठिकाणी निर्बंध कमीही केले आहेत. यापुढेही टप्याटप्याने निर्बंध कमी केले जातील. तज्ञांच्या माहितीनुसार तिसरी लाट मार्च महिन्याच्या मध्यात संपुष्टात येणार आहे, त्यामुळे शासनाचा कल निर्बध कमी करण्याकडे असेल, असेही टोपे यावेळी म्हणाले.





