नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांनी राजीनामा दिला आहे. महागाई, घटता जीडीपी यांसारखी आव्हाने अर्थव्यवस्थेसमोर असताना विश्वनाथन यांचा राजीनामा आरबीआयला मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, वर्षभरात राजीनामा देणारे तिसरे उच्चपदस्थ अधिकारी ठरले आहेत. जून 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला होता. त्यापूर्वी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर 2018 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, एन.एस. विश्वनाथन जूनमध्ये निवृत्त होणार होते. मात्र, त्याआधीच तब्येतीचे कारण देत त्यांनी राजीनामा दिला आहे. ताणामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, १९८१ साली विश्वनाथन यांनी आरबीआयमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. बँकिंग क्षेत्रातील उत्तम जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे. विशेषतः या क्षेत्रासंबंधीचे नियम आणि कायदे याचे ज्ञान त्यांना चांगल्या प्रकारे आहे. त्यांच्या कौशल्यामुळेच माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला होता. विश्वनाथन हे बँकिंग नियंत्रण, सहकार क्षेत्रातील बँकींग आणि खात्यांच्या विमा क्षेत्रावर लक्ष ठेवून होते.