पुणे : केंद्रशासन व राज्यशासनाच्या सूचनांनुसार महापालिकेकडून तृतीयपंथी वर्गाचे समक्षमीकरण, त्यांना नोकरीमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळया योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या सुरक्षा विभागात 50 तृतीयपंथी सुरक्षा रक्षक नियुक्त केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडून तयार करण्यात आला असून, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला सुरक्षा रक्षक म्हणून या सर्वांची नियुक्ती महापालिकेत मोठया प्रमाणात वर्दळ असलेल्या ठिकाणी केली जाणार असल्याची माहिती सुरक्षा विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. पण त्याचसोबत महापालिकेला कामाच्या ठिकाणी त्यांच्यासाठी सौहार्दाचे व चांगले वातावरण उपलब्ध करून देणे, स्त्री, पुरुष कर्मचाऱ्यांचे वर्तनही चांगले ठेवणे यासाठी विशेष सूचना दिल्या जाणार आहेत. केंद्रशासन व राज्यशासनाच्या धोरणानुसार महापालिकेकडून तृतीयपंथींसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी तसेच महापालिकेच्या इमारतींमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यात आली असून, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने सुरक्षा विभागाने पुढाकार घेतला आहे. यामध्ये 50 तृतीय पंथीयांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे. सध्या दोन ठेकेदारांकडून 1640 कंत्राटी सुरक्षा रक्षक घेतले आहेत, त्यांच्याकडूनच या 50 जणांना कामावर घेतले जाईल. सध्या 28 जणांचे अर्ज आले आहेत. त्यास अतिरिक्त आयुक्त व आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर त्यांना पालिकेच्या सेवेत घेतले जाणार आहे. महापालिकेची मुख्य इमारत, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, राजीव गांधी रूग्णालय येरवडा, सारसबाग तसेच मंगळवारपेठेतील महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयात त्यांची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नोकरी मिळावी यासाठी काही सामाजिक संघटनांनी याबाबत मागणी केली होती. महापालिकेकडून याबाबत प्राथमिक निर्णय घेतला जाणार आहे. त्याबाबत प्रशासनाकडून आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला जाईल. मात्र, त्या बाबत अद्याप अंतीम निर्णय झालेला नाही. – माधव जगताप, उपायुक्त, सुरक्षा विभाग